चिपळूण :—मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचा प्रसार, प्रचार व संवर्धन करण्यासाठी, मराठी वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी दरवर्षी ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा केला जातो. ‘मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी’ संचलित ‘डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने’च्या ‘मराठी विभाग’ आणि ‘मराठी भाषा वाडमय मंडळा’च्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमांतून हा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. दिनांक 17 जानेवारी रोजी ‘चारोळी सादरीकरण’ हा उपक्रम संपन्न झाला.
13 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. दिनांक 25जानेवारी रोजी ‘निबंध स्पर्धा’ घेण्यात आली. एकुण 16 विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेला होता. तर 30 जानेवारी रोजी ‘मराठी भाषा संवर्धन आणि अभिजात दर्जा’ या विषयावर ‘सौ. मंजिरी मनीष दळवी ( सहा.शिक्षिका. वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाने’) यांचे अतिथी व्याख्यान झाले. “मराठी भाषा ही आपलीं मातृभाषा असल्याने प्रत्येकाने तिचा अभिमान बाळगला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपण बरेचसे शब्द इंग्रजी भाषेतले वापरतो.
तर त्या ऐवजी आपण मातृभाषेला प्राधान्य दिले तर अधिक गोडवा त्या भाषेला येतो” असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्र संचालन प्रा. विक्रांत टेरवकर तर आभारप्रदर्शन प्रा. प्रियांका माने यांनी केले.











