कोळकेवाडी दरड प्रवण क्षेत्रात खोदकाम

वाड्या-वस्त्यांना धोका; खोदकाम थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी)–ः कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे तालुक्यातील अडरे, अनारीसह 22 गावांसाठी पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी कोळकेवाडी गावातून खोदकाम केले जात आहे. कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाच्या अंतर्गत येणारा हा परिसर दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सद्यस्थितीत गावात केल्या जात असलेल्या खोदकामामुळे तेथील वाड्या-वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. तरी सदरचे खोदकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या उपअभियंत्याकडे केल्याची माहिती उपसरपंच सचिन मोहिते व माजी सरपंच निलेश कदम यांनी दिली.

 

 

मुळातच कोळकेवाडी गाव हे प्रकल्पबाधीत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. सध्या येथील शेतकऱ्यांकडे आणि ग्रामपंचायतीकडे विविध लोकोपयोगी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. शासनाची कोणतेही योजना राबवायची झाली तर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली जाते. ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सहकार सेवा सोसायटी आदी इमारत उभारणीसाठी जागेची मागणी केली असता जागा देण्यास नकार दिलेला आहे. आजपर्यंत कोळकेवाडी धरणातून या परिरातील अनेक गावांना ग्रॅव्हिटी पाणी योजना दिलेल्या आहेत. या योजनांसाठी प्रत्येक वेळी या गावातून खोदकाम केले गेले आहे. ग्रामपंचायतीने कधी परवानगी मागितली तर ती न देणारे धरण व्यवस्थापन बाहेरील गावांसासाठी पाणी योजनांना कशा परवानग्या देते, असा सवाल उपसरपंच सचिन मोहिते व माजी सरपंच निलेश कदम यांनी उपस्थित केला.

 

 

सध्या अडरे, अनारीसह 22 गावांसाठी ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी या गावात ठिकठिकाणी खोदाई सुरू आहे. याचपरिसरात पाणी योजनेसाठीचा मोठा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी विहीर खोदाई सुरू आहे. याच खोदकामांच्या वरील बाजूस ज्या वाड्या वसल्या आहेत, तेथे अतिवृष्टीत जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहाणीत या वाड्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना प्रशासनाला यापूवच केली आहे. येथील वाड्यांना पावसाळ्यापूव स्थलांतराचे आदेश दिले जातात. मात्र त्यांना पुनर्ववसनासाठी गावात जमिनी दिल्या जात नाहीत. येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. या शेतकऱ्यांना अद्याप पुनर्वसनातील जमिनी मिळालेल्या नाहीत. या परिस्थितीत इतर गावातील कुटुंबाचे येथे पुनर्वसन केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी योजनेतील शुद्धीकरण प्रकल्पाच्या खोदकामास देखिल विरोध केला आहे. त्यामुळे खोदकाम थांबविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.