सिंधुदुर्ग, ठाणे संघ उपांत्य फेरीत दाखल

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा : मालवण बोर्डिंग मैदान येथे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024-25 अंतर्गत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे व उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान, सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडाधिकारी सचिन रणदिवे, ओंकार ओतारी, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून आंब्रोज अल्मेडा, दीपक धुरी, सुशील शेडगे, समलोचक म्हणून शाम वाक्कर, रुपेश आळवे, रोहन कदम, गुणलेखक म्हणून ज्ञानेश केळूसकर यांनी काम पाहिले.

सिंधुदुर्ग व ठाणे संघ उपांत्य फेरीत दाखल

स्पर्धेच्या पहिल्या सामान्यात मुंबई शहर संघाने 15 षटकात 89 धावा केल्या. सिंधुदुर्ग संघाने हे आव्हान सहा गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण करत विजय संपादन केला. तर दुसऱ्या सामन्यात ठाणे संघाने 161 धावांचा डोंगर उभा केला. 162 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पालघर संघ 119 धावा करू शकला. ठाणे संघाने 42 धावानी विजय संपादन केला.

आज होणारे सामने

रायगड व मुंबईउपनगर यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्या नंतर गतवर्षीचा विजेता रत्नागिरी संघ व सिंधुदुर्ग संघ यांच्यात पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर ठाणे व पहिल्या सामन्यातील विजेता यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. बुधवारी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.