आचिर्णे येथे हार्वेस्टरच्या सहाय्याने हळद काढणी

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ

वैभववाडीत 35 शेतकऱ्यांकडून 43 एकरात हळद लागवड

वैभववाडी प्रतिनिधी:
तालुक्यात हार्वेस्टर च्या सहाय्याने हळद काढणीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते आचिर्णे येथील अजित रावराणे यांच्या शेतावर करण्यात आला. यावेळी रावराणे म्हणाले, तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा बँकेमार्फत नवनवीन यंत्रसामुग्री आणण्यासाठी सहकार्य करू, त्याचप्रमाणे शासनाच्या अशा योजनांचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घेऊन उहळदीचे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करावे.

सिंधू रत्न समृद्ध योजनेअंतर्गत वैभववाडी आणि दोडामार्ग येथे मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यात 35 शेतकर्यांनी 43 एकर वरती हळद लागवड केली आहे. विशेष म्हणजे हळद या पिकाला वन्य प्राण्यांकडून कोणताही त्रास होत नसून आपल्या हवामानामध्ये हळद चांगली होत आहे. कोकण व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि वैभववाडी हळद उत्पादक गट यांच्यामार्फत हे शेतकरी एकत्र आले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे कुलगुरू डॉ भावे, प्राध्यापक डॉ. राणे यांच्या सहकार्यातून कोकणातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, यासाठी प्रयत्न करावेत असे कंपनीचे अध्यक्ष मंगेश कदम यांनी सांगितले. लवकरच कंपनीमार्फत हळद उखळणी यंत्र येणार असून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन हळद उकडून देण्यात येणार आहे. अशी माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी नितीन देशमुख, श्री लांबोर, श्री वाघमोडे, महेश रावराणे, सुशील रावराणे, रवींद्र गावडे, नंदकुमार आमरसकर, धुळाजी काळे, मुकुंद रावराणे, सचिन रावराणे, भाई रावराणे, संजय रावराणे, सिद्धेश रावराणे, यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.