कुणकेश्वर पुलाच्या कामाला गती देण्यासाठी ना. नितेश राणे यांनी घेतली मंत्रालयात बैठक

आज मंत्रालयात रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील पुलाच्या कामासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतली.

या कामाचे भूसंपादन योग्यरित्या करण्याच्या सूचना देऊन हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावे, असे सांगण्यात आले. याबाबत स्थानिकांना माहिती देण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी अधिकारी कुणकेश्वर येथे जाऊन ग्रामस्थांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून कामाची सविस्तर माहिती संबंधितांना देणार आहेत. तसेच, संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

कुणकेश्वर येथील हा पूल केबल स्टड प्रकारातील असणार आहे. एकूण १८१ कोटी रुपयांचा हा पूल असणार आहे. त्याची लांबी ३३० मीटर असून रुंदी १.८ मीटर असणार आहे. जोड रस्तासह या संपूर्ण कामाची लांबी १.५८० कि.मी. इतकी आहे. या कामामुळे कुणकेश्वर आणि देवगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.