जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला वैभववाडी तालुका दौरा

आंबा- काजू पंचनामे क्षेत्रभेट

ग्रामीण रुग्णालयाला भेट देत घेतला सोयी सुविधांचा आढावा

सिंधुदुर्ग नगरी, दि. २५ (जिमाका):
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत कामकाजाचा आढावा, जनगणना प्रशिक्षण मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय भेट, आंबा-काजू पंचनामे क्षेत्रभेट अशा विविध कामांचा सखोल आढावा घेत मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वाभवे–वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाला भेट देत नगरपंचायतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील विविध विकासकामे, उत्पन्नवाढीचे उपाय, स्वच्छ सर्वेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात आयोजित घरगणनेच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रिया अचूक, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट देत तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची तपासणी करून रुग्णांना वेळेवर व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

नाधवडे परिसरातील शेतकरी निता बाळकृष्ण कुपटे व राजेश परशुराम तावडे यांच्या शेताला भेट देत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची सविस्तर माहिती घेतली. पंचनामा प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पडावी, यावर भर देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

या पाहणीवेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन गवारी, ग्राम महसूल अधिकारी बागल, सहाय्यक कृषी अधिकारी शेळके तसेच ग्राम विकास अधिकारी घुगे आदी उपस्थित होते.