देवगड मधील विजापुरी मजुराचा आकस्मिक मृत्यू

देवगड / प्रतिनिधी

पडेल कॅन्टीन येथे कामास गेलेल्या मल्हारी केरबा पांढरे (४५, रा. जामसंडे, मूळ रा. खिल्लारटी- शिवगुनशी, ता. बब्बलेश्वर, जि. विजापूर) याचा २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.१५ वा. च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेची नोंद विजयदुर्ग पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल कॅन्टीन येथील अमोल तांबे (४५, मूळ रा. खिल्लारटी- शिवगुनशी, ता. बब्बलेश्वर, जि. विजापूर) यांचा खोदकाम करणे, मोलमजुरीचा व्यवसाय आहे. या कामासाठी त्यांच्याकडे माळसिद्ध गोपणे (४५, रा. पडेल कॅन्टीन), भिमू लोणार (४०), आनंद दरगुडे (३५) व मल्हारी पांढरे (सर्व रा. जामसंडे) हे गेल्या दोन वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होते. अमोल तांबे यांनी सौंदाळे येथील एका घराचे पाईपकरिता लागणारे खड्डे मारण्याचे काम घेतले होते. २४ रोजी सकाळी १० वाजता अमोल तांबे यांच्यासह मल्हारी पांढरे व भाचा अरुण डहाळे हे सौंदाळे गणेशनगर येथे काम करण्यास गेले होते. दुपारी १२.३० वाजेपर्यंत त्यांनी काम केले. परंतु तेथे लादी बसविण्याचे काम सुरू असल्याने त्यांना लाईट मिळत नव्हती. म्हणून मल्हारी पांढरे याने अमोल तांबे यांना, ‘मी आज काम करीत नाही. मी तुमच्या घरी जाऊन आराम करून सायंकाळी घरी जातो’, असे सांगितले. त्यानुसार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अमोल तांबे हे त्याला घेऊन घरी परतले. तेथे तो पाणी पिऊन झोपला. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अमोल तांबे हे त्याला उठवायला गेले असता त्याची काहीच हालचाल जाणवली नाही. तो निपचित पडलेला होता. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची फिर्याद अमोल तांबे यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.