ओझरेखुर्द येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; देवरूख बोटकेवाडीतील तरूणाचा मृत्यू

crime

Two-wheeler head-on collision at Ozrekhurd; Death of a youth in Devrukh Botkewadi

देवरूख– देवरूख नजीकच्या ओझरेखुर्द येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात घडला. या अपघातात देवरूख बोटकेवाडीतील तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. मनोज शंकर गोंधळी (वय-२०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या अपघातात दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज गोंधळी हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन काटवली येथून देवरूखकडे येत होता. तर दुसरा दुचाकीस्वार सनी नामदेव शेट्ये हा दुचाकीवरून देवरूखहून ओझरेकडे जात होता. याचवेळी ओझरेखुर्द गणपती मंदिराजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये मनोज व सनी हे दोघेही जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने दोघांनाही रत्नागिरीतील जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. तर सनीवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, मनोजच्या अपघाती मृत्यूने बोटकेवाडीवर शोककळा पसरली आहे.