रत्नागिरी : समर्थ भारत अभियान आयोजित राज्यस्तरीय मनाच्या श्लोकांची पाठांतर स्पर्धा १६ फेब्रुवारीला पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुल होणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्राथमिक फेरीत निवडलेले जवळपास ९५ विद्यार्थी व २ जण खुल्या गटातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
रत्नागिरीतून कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर १४ विद्यार्थी, गोदावरीदेवी बियाणी बालमंदिर १० विद्यार्थी, पटवर्धन हायस्कूल १, आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिर ८, परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर ३, फाटक हायस्कूल ७, ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर १०, दामले विद्यालय १, जीजीपीएस १३, जीजीपीएस गुरुकुल १, पुष्पदत्त हायस्कूल २, खंडाळा बालमंदिर २, आदर्श विद्यामंदिर पाली क्र. २ चे २ विद्यार्थी, मराठा मंदिर पाली १, जगद्रगुरु नरेंद्राचार्य महाराज विद्यालय ४, एसव्हीएम ३, माखजन हायस्कूल ३, फणसोप हायस्कूल ३, लांजा हायस्कूल १, पाध्ये देवरुख स्कूल ४, खुला गट २ असे एकूण ९७ जण सहभागी होणार आहेत.
रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, सातारा, कराड, पुणे, मुलुंड, मालाड, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि पिंपरी- चिंचवड येथून २४ हजार विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीत भाग घेतला. त्यातील निवडक साडेपाचशे मुलांना राज्यस्तरीयला भाग घेण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी अभिषेक चैतन्य गिरी (संन्याशाश्रम, केरळ आश्रम, ऋषिकेश) आणि परमपूज्य अजेय बुवा रामदासी (समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड) उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात स्पर्धा झाल्यावर संध्याकाळी चार वाजता बक्षीस समारंभ होईल. या सर्व स्पर्धकांना रत्नागिरीच्या संयोजिका डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या.











