दोडामार्ग | सुहास देसाई
तिलारी घाट बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे त्यामुळे तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली. या कामासाठी शासनाकडून २३ लाख मंजूर आहेत. मात्र भिंतीची लांबी अधिक असणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकचा निधी आपण शासनाकडून मंजूर करून आणू, अशी ग्वाही देत घाट रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
वारंवार कोसळणारे घाटातील रस्ते मोऱ्या यामुळे वाहतूक कोंडी होते तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर रस्त्याचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात कोसळला होता. त्यामुळे वाहने हाकणे जिकिरीचे बनले होते. शिवाय या ठिकाणी वाहनांना एकमेकांना बाजू देणे जीवघेणे बनले. खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती यावर्षी होईल की नाही? अशी शंका उपस्थित होऊ लागली. मात्र यासाठी निधी मंजूर झाला व रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली.
चंदगड मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीची लांबी अतिशय कमी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ठेकेदाराकडून कामाबाबत आढावा घेतला. संरक्षक भिंतीची लांबी अधिक असली असती तर वाहने चालविणे सुलभ बनले असते. सध्या मंजूर भिंतीचे व रस्त्याचे काम पूर्ण करा. तोपर्यंत आपण भिंतीची लांबी वाढविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू व अधिकचा निधी मंजूर करून घेऊ अशी ग्वाही दिली. शिवाय कामगारांची संख्या वाढवा , अधिक मशिनरी उपलब्ध करून रात्र दिवस तातडीने काम सुरू ठेवून पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधिताना दिल्या आहेत












