वरेरी मसरण शाळेच्या बालकलाकारांचा रंगतदार कलाविष्कार!

वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव आणि दातृत्व सन्मान सोहळा थाटात संपन्न

शिरगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरेरी मसरण येथे “वार्षिक स्नेहसंमेलन कलासंध्या २०२५” आणि “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” उत्साहात पार पडला.

या विशेष सोहळ्यात गावातील माता-भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाली. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन सरपंच सौ. प्रिया गोलतकर यांच्या हस्ते पार पडले.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महिलांसाठी झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले.

“वार्षिक स्नेहसंमेलन कलासंध्या २०२५” मध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, मूकनाट्य आणि वकृत्व अशा विविध कलाप्रकारांचे बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या उत्तम सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.

या शाळेसाठी विनामूल्य जागा दान करणाऱ्या गोलतकर कुटुंबाचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या सुविधा मिळू शकल्या. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण कोकरे सर यांना मिळालेल्या “आदर्श शिक्षक पुरस्कार” बद्दल ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला.

या भव्य सोहळ्याला सरपंच प्रिया गोलतकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण झोरे, शिक्षणप्रेमी प्रफुल्ल गोलतकर, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष संतोष खरात, युवा उद्योजक संतोष साळसकर, तसेच परिसरातील शिक्षक वर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लक्ष्मण कोकरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष वेखंडे सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. शेवटी लक्ष्मण कोकरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शाळेच्या शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना नवे संधीचे दार उघडले आणि आत्मविश्वास वाढीस लागला, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.