तुम्हाला माहित आहे का ? महाराजांनी पहिली आरमारी स्वारी केले ते ठिकाण कुठे आहे ?

राजापूर, विजयदुर्ग, देवगड व मालडीच्या खाड्यामध्ये महाराजांनी नवीन 50 तारवे बांधून तयार ठेवली होती. महाराजांच्या या आरमारी तयारीमुळे पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराजांची धाड कुठे पडणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. महाराजांचा रोख यावेळी बसनूरकडे होता.

बसनूर राज्य शिवाप्पा नायकाच्या काळात वैभवाला आले (1645-60). आदिलशाही दुर्बलतेचा फायदा घेत, त्याने आपले राज्य घाटावर आणि घाटाखाली समुद्रकिनाऱ्यावर वाढवले. 1660 ला शिवाप्पा नायकाचा मृत्यू झाला आणि तिथे सत्ता संघर्ष सुरू झाला. शिवाप्पाचा भाऊ वेंकटप्पा आणि मुलगा भद्राप्पा या चुलत्या-पुतण्यात संघर्ष चालू झाला. याच काळामध्ये पोर्तुगीज आणि डच सत्ता संघर्षही पराकोटीला पोहोचला होता. याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी बसनूरवर स्वारी केली.

महाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील मालडी येथे आले व इथल्या खाडीत त्यांनी 85 छोटी व 3 मोठी गलबते स्वारीसाठी सिद्ध केली. महाराजांच्या या पहिल्या नौकारोहणाची तारीख होती 8 फेब्रुवारी 1665. याच वेळी योगायोग असा की मुंबई बेटाचा ताबा पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिला. याच निमित्ताने पोर्तुगीज मुंबईला गेले, त्यामुळं महाराज कोणतंही विघ्न न येता गोव्याजवळून पुढे सरकले आणि बसनूरला उतरले.

मालडीपासून बसनूरपर्यंत महाराजांना वेंगुर्ले, गोवे, कारवार, गोकर्ण, कुमठे, होणावर, भटकळ, गांगुळी ही बेटे लागतात. यावरून महाराजांचा प्रवास हा नक्कीच 4 ते 5 दिवसांचा झाला असावा. 13 किंवा 14 फेब्रुवारीला महाराज बसनूरला पोहोचले आणि छापा घालून त्यांनी ते पूर्ण एक दिवस लुटले. बसनूरच्या लुटीत महाराजांना अगणित माल, जड विहार, कापड, मौल्यवान जिन्नस सापडले.

डचांच्या नोंदीनुसार महाराजांनी बसनूरच्या सात व्यापार्यांना कैद करून सोबत नेले. हे व्यापारी महाराजांनी मागितलेली खंडणी न भरू शकल्यामुळे कैद झाले. सभासद बखरीच्या उल्लेखानुसार महाराजांना या स्वारीमध्ये 2 कोटी होन एवढा खजिना मिळाला. ही लूट जहाजावर लादून महाराज परतले. ते गोकर्ण महाबळेश्वरला पोहोचले आणि तिथून 4000 पायदळासोबत अकोल्यास गेले. तिथून त्यांनी लुटीची जहाजे पाठवली आणि स्वतः 4000 सैन्यासह खुश्कीच्या मार्गाने कारवारला निघाले. 22 फेब्रुवारीला महाराज कारवारला पोहोचले.

महाराज कारवारला पोहोचले ही बातमी इंग्रजांना हेरांकडून कळाली होती. तरीही इंग्रज एवढे धास्तावले होते की त्यांनी आपला माल मस्कतच्या एका अरबी जहाजावर भरला आणि तिथून पुढे पळून जाण्याच्या तयारीत राहिले.


मालडी बंदर: ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन विकासाची संधी

मालवण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले मालडी बंदर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराच्या महत्त्वाच्या मोहिमेचे साक्षीदार ठरले आहे. १६५९ मध्ये महाराजांनी परकीय आक्रमकांविरुद्ध भक्कम सागरी आरमाराची स्थापना केली होती, ज्यामुळे मालडी बंदरास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

पूर्वी हे बंदर व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि मोगल सम्राटांच्या शस्त्रास्त्रांसह विविध महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक येथे होत असे. काळाच्या ओघात या बंदराचे व्यापारी महत्त्व कमी झाले, मात्र आजही ते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व राखून आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी मालडी बंदराच्या पुनर्विकासाची मागणी केली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणे, बॅकवॉटर प्रकल्पाचा विकास करणे, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारणे यांचा समावेश आहे. सध्या मालडी-मालोंड नदीवर पूल उभारला जात असून, त्याच्या कार्यान्वयनानंतर या भागातील अनेक गावांना जोडणी मिळेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनीही आपल्या अभ्यासातून महाराजांच्या बसनूर मोहिमेचा आणि त्या काळातील ऐनाच्या झाडाचा उल्लेख केला आहे, जे आजही चांगल्या स्थितीत उभे आहे. शिवाय, मत्स्य व्यवसाय प्रकल्प उभारल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

दरवर्षी १९ फेब्रुवारीला येथे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने ग्रामस्थांनी शासनाकडे मालडी बंदराच्या पुनर्विकासासाठी लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे केवळ ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीही आवश्यक आहे.

तरी शासनाने मालडी बंदराच्या ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मालडी ग्रामस्थांची मागणी आहे. हे बंदर भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.