मंदिरांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी उरूस साजरा करण्याचा प्रयत्न
उरूस साजरा करण्यास परवानगी देऊ नये
राजापूरातील हिंदू समाज बांधवांचे पोलिसांना निवेदन
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात असलेल्या पुरातन सुर्य मंदीरामध्ये यापुर्वी कधीही कोणत्याही स्वरुपाचे उत्सव हे मुस्लीम समाजाकडून करण्यात आलेले नसताना आता या मंदीराचे अस्तीत्व घालवून तेथे खोडसाळ ढाचे उभारुन सदर पुरातन मंदीर नष्ट करण्याच्या हेतूने काही व्यक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या सुर्यमंदिराच्या ठिकाणी उरूस साजरा करण्यास परवानगी देवू नये, अशी मागणी राजापुरातील हिंदु बांधवांनी एका निवेदनाद्वारे राजापूर पोलीसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी हिंदू समाजबांधवांनी राजापूर पोलीस निरीक्षक राजराम चव्हाण यांना दिले आहे.
राजापूर शहरातील माछीमार्केट जवळ इ.स.वि.सन 700 मध्ये सातवाहन राजाने बांधलेले असावे असे पुरातन सुर्य मंदीर असून सदरचे सुर्य मंदीर हे हिंदु बांधवांचे श्रध्दा स्थान आहे. या मंदीराचा उल्लेख हा सन 1717 मधील बखरीमध्ये देखील आढळून येतो. सदर मंदीराचे उल्लेख त्यांनतर सन 2015 मध्ये प्रसिध्द झालेल्या राजापुरचा इतिहास या पुस्तकात देखील आहे. सदरचे पुस्तक हे इतिहासकार व स्वातंत्र्य सैनिक कै. प्रभाकर द. मराठे यांनी लिहलेले आहे. सदरचे मंदीर हे प्राचिन असून, मंदीराचा ढाचा व अन्य शिल्पे पाहिल्यास सदरचे हिंदु मंदीर असल्याचे स्पष्ट होणारे आहे. तसेच, सदर मंदीराबाबत अन्य देखिल इतिहास असुन, योग्य त्या कागदपत्रांसहित सदरचे पुरावे सादर करणेस आमची तयारी आहे.
दरम्यान सदर मंदीराकडे मुस्लीम समाजाचा कोणताही हक्कसंबंध नव्हता व नाही. मात्र या पुरातन मंदिराबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्ती खोडसाळ कृत्याव्दारे गैरप्रकार करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सदर सुर्य मंदीर असलेल्या जमीन मिळकतीचे महसुल दफ्तरी देखील खोडसाळ प्रकार केल्याचे दिसून येत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कसेही असले तरी सदरचे सुर्य मंदीर हे पुरातन असे असून राष्ट्राची संपत्ती आहे व त्याबाबत खोडसाळ कागदपत्र करुन त्याचे अस्तित्व नष्ट करता येणारे नाही.
तसा मंदीरामध्ये त्याचे अस्तित्व नष्ट करणेचा प्रयत्न करुन काही खोडसाळ ढाचे देखील उभारण्याचा प्रयत्न वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर करण्यात आला असल्याचे समजते. या मंदीरामध्ये यापुर्वी कधीही कोणत्याही स्वरुपाचे उत्सव हे मुस्लीम समाजाकडून करण्यात आलेले नव्हते. मात्र आता या मंदीराचे अस्तित्व नष्ट करण्याचे हेतूने या ठिकाणी उरुस साजरा करण्याची परवानगी मागण्या करीता म्हणून एक अर्ज दिला असल्याचे समजते. मात्र सदरचे मंदीर हे पुरातन असुन हिंदु समाजाचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मंदीराचे पावित्र्य नष्ट करुन अन्य कोणत्याही धर्मीयांनी कोणत्याही स्वरुपाचे उत्सव केल्यास सामाजिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे माछीमार्केट जवळील सुर्य मंदीराया ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला उरूसाचे आयोजन करणेस परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे हिंदू समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना देण्यात आले असून यावेळी महेश मयेकर, सुरज पेडणेकर, विनोद गादीकर, विवेक गुरव, कैलास कोठारकर, प्रसन्न देवस्थळी, निकेश पांचाळ, निखील चव्हाण, अभी चव्हाण यांसह हिंदु समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर समस्त हिंदू बांधवांच्या सहया आहेत.












