खेड (प्रतिनिधी) : –
सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेऊन मर्दुमकी गाजविणारे आणि भारतीय सैन्यदलातील मराठा रेजिमेंट मध्ये २४ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले तालुक्यातील जामगे येथील वरिष्ठ माजी सैनिक अनंतराव दत्ताराम कदम यांचे दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक कन्या आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय अनंतराव कदम यांच्या अंत्यसंस्कारावेळी सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी आणि आजी माजी सैनिक संघटना, खेड (रजि.) यांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष श्री. डी.डी. आखाडे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.
संघटनेचे सचिव व येथील रेल्वे स्टेशन मास्तर निलेश मोरे, पदाधिकारी भार्गव चाळके, काशिनाथ मोरे तसेच सुभेदार प्रताप कदम, रमेश कदम, बळीराम मोरे, गजानन कदम, शशिकांत आंब्रे, संतोष कदम आणि मोठ्या संख्येने खेड तालुक्यातील माजी सैनिकांसह पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थ उपस्थित होते.












