विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला मनसेचा दणका

येत्या मंगळवारी बिडीओ व शिक्षण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

बांदा : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला प्रशालेच्या कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेत जाब विचारला. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. त्या मुख्याध्यापकाची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत येत्या मंगळवारी गटविकास अधिकारी व शिक्षण विभाग अधिकारी यांच्या समवेत प्रशालेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बांदा शहरा लगतच्या एका गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणावरून गावातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. आपल्या मुलाला मारहाण होऊनही शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने मुलाच्या वडिलांनी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांचे लक्ष वेधले होते.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊत, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, उपाध्यक्ष सुनील आसवेकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपजिल्हाध्यक्ष साहिल तळवडेकर यांनी गुरुवारी सायंकाळी सदर प्रशालेत धडक देत जाब विचारला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अस्मी पंतोजी, सदस्य विवेक खोबरेकर, राजेश चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी मारहाण प्रकार झालाच नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगताच मनसे पदाधिकारी आक्रमक झालेत. प्रशालेतील विद्यार्थी, मुलाचे आईवडील, ग्रामस्थ काय खोटे बोलत आहेत का ? असा सवाल सुनील आसवेकर यांनी उपस्थित केला. यावेळी बरीच शाब्दिक खडाजंगी झाली.

अखेर येत्या मंगळवारी गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व मनसे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाची तत्काळ बदली करावी अशी जोरदार मागणी केली. यावेळी पिडीत विद्यार्थ्याच्या आई व वडिलांचे डोळे पाणावले होते.