रत्नागिरी- स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासाच्या व्यवस्थापनेखालील पोमेंडी येथील श्री. देव रामेश्वर
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. त्या निमित्ताने महाशिवरात्रीचे औचीत्त्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मंदिरासाठी भाविकांनी २ कळस दिले असून त्यांची शोभायात्रा मंगळवार दिनांक २५-०२-२०२५ रोजी कारवांची वाडी आकाशवाणी केंद्रासमोरील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासाच्या प्रांगणातून दुपारी २ वाजता निघून कुवारबांव- देवधे फाटा- काजरघाटी धारेमार्गे उतार उतरून – पोमेंडी बुद्रुक सीमेवरील श्री देव रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाणार आहे. त्याच दिवशी रात्री १० वाजता काजरघाटी येथील युवक मंडळाची नमनसेवा श्री. देव रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात सादर होणार आहे. बुधवार दिनांक २६-०२-२०२५ रोजी जीर्णोद्धार झालेल्या मंदिराची वास्तुशांत सकाळी ७.३० ते १० या वेळात होणार असून ११ वाजेपर्यंत दोन्ही कलशांच्या आरोहणाचा (कलशारोहण) विधी संपन्न होणार आहे. नंतर १२ वाजेपर्यंत जीर्णोद्धारासाठी विविध प्रकारे भरीव हातभार लावलेल्या १२ भाविकांचा सत्कार होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळात समस्त भाविकांसाठी मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रत्नागिरी, कुवारबांव, खेडशी, नाचणे, पोमेंडी खुर्द व बुद्रुक, सोमेश्वर, टेंबे, टिके, हातीस आदी दशक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. देव रामेश्वर न्यासाचे अध्यक्ष श्री. निरंजन जोशी आणि स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासाचे कोषाध्यक्ष व श्री. देव रामेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शरद नागवेकर यांनी केले आहे.











