साळिस्तेत ट्रकमधील औषधांची चोरी

कणकवली : गोवा, वेर्णा येथून एका कंपनीची औषधे मुंबईला घेऊन जाणारा ट्रक शुक्रवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील साळिस्ते येथील यादव ढाबा येथे थांबला होता. जेवण करण्यापूर्वी मालाच्या वाहनाचे सिल चेक करण्यासाठी ट्रक चालक ओमप्रकाश राजेंद्र चौरासिया (३२, रा. उत्तरप्रदेश) हे गेले असता कंपनीचे सिल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे दिसून आले.

 

त्यात फिना स्टेरॉइड टॅबलेट ५ एमजी असे लेबल असलेला औषधांचा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा एक बॉक्स चोरीस गेल्याचे तर इतर चार बॉक्सचे फाडून नुकसान केल्याचे दिसून आले. त्यामुळे चौरासिया यांना धक्काच बसला. त्यांनी या घटनेबाबत तेथे उपस्थित असलेल्या अन्य वाहनचालकांना माहिती दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ ते रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार ओमप्रकाश चौरासिया यांनी कणकवली पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.