शंकर आडेलकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
सावंतवाडी । प्रतिनिधी : पैसा म्हणजेच परमेश्वर अशी परिस्थिती असलेल्या सध्याच्या जमान्यात काहीजण मात्र आपला प्रामाणिकपणा आजही टिकवून आहेत याची काही उदाहरणे कधीतरी दिसून येतात.
आंबेगाव येथील साई धाकू शेळके या ६० वर्षीय वृद्ध महिलेची रस्त्यात पडलेली
१४ हजार रुपये असलेली पैशाची पिशवी जिल्हा माहिती कार्यालय ओरोस येथील शिपाई शंकर दत्ताराम आडेलकर यांना सापडली. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणा दाखवित ती त्यांचा शोध घेऊन परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
साई शेळके ही महिला सावंतवाडी शहरांमध्ये गेली अनेक वर्षे गावठी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सदर महिलेचे पती वयोरुद्ध आहेत तर तिचा ४० वर्षाचा मुलगा फिट येऊन सतत आजारी पडतो तर सून मुकबधीर आहे. तसेच तिच्या पदरात अन्य दोन मुलीही आहेत. असा हा सर्व भार या एकट्या महिलेवर पडल्या कारणाने तिला खूप कष्ट घ्यावे लागतात. कुटुंबातील सदस्यांच आजारपण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती सकाळी ६ वाजता भाजी घेऊन सावंतवाडी गाठते ती संध्याकाळी काळोख पडल्यावर अन्नधान्य घेऊन घरी परतते.
रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे भाजी विक्री करण्यासाठी ती आली असताना
तिची पैशांची पिशवी कुठेतरी पडली. त्याची ती शोध घेत असतानाच समीर पडते ही व्यक्ती तिच्याकडे भाजी खरेदी करायला गेली असता तिने रडतच त्यांना “बाबा माझे पैसे कुठेतरी पडले मी आता काय करू ” असे सांगत आपली व्यथा कथन केली. समीर पडते तिला म्हणाले काळजी करू नकोस तुझे पैसे तुला मिळतील असं सांगून तेथून निघून गेले.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी खासकीलवाडा येथील नागरीक व जिल्हा माहिती कार्यालय ओरोस येथील शिपाई शंकर आडेलकर यांची भेट पडते यांच्याशी झाली. तेव्हा आडेलकर पडतेना सहज म्हणाले काल कुणाची तरी पैशाची पिशवी मला मिळाली.
हे वाक्य ऐकून पडते यांना त्या भाजी विकेत्या महिलेची पिशवी हरवल्याची आठवण झाली. त्यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ती कुठे सापडली नाही.
अखेर सोमवारी सकाळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सोबत त्या महिलेचा शोध घेतला असता तिची अखेर भेट झाली.
सदर महिलेला आपल्या पैशाच्या पिशवीची ओळख पटली. त्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांच्या मध्यस्थीने तिची १४ हजार रुपयाची रक्कम असलेली पिशवी तिच्याकडे सुपूर्त केली.
यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व डोळ्यात आलेले आनंदाश्रु खूप काही सांगून गेले. तिने मनोनन त्या दोघांचे आभार मानले व आशीर्वादही दिले.
यावेळी पोलीस कर्मचारी मुकुंद सावंत, पुंडलिक सावंत, तुकाराम जाधव, मयूर सावंत, शंकर आडेलकर समीर पडते व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आदी उपस्थित होते.











