परप्रांतीय मुस्लिम व्यक्तीच्या कृत्याचा मालवणातील मुस्लिम समाजाकडून निषेध

देश विरोधी भुमिका घेणाऱ्या अश्या परप्रांतीयां विरोधात कठोर कारवाई करा : पोलीस व तहसील प्रशासनास दिले निवेदन

मालवण | प्रतिनिधी : भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दरम्यान भारत देशा विरोधात घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम व्यक्तीच्या कृत्याचा मालवणातील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत मालवण तहसीलदार व मालवण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, देश विरोधी भुमिका घेणाऱ्या अश्या परप्रांतीयां विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. जेणेकरून असे कृत्य करण्याची हिंमत दुसऱ्या व्यक्तीची होणार नाही. असेही मुस्लिम समाज बांधवानी सांगितले.

सुन्नत जामतुल मुस्लिमीन मालवण संस्थेच्या वतीने मालवणातील स्थानिक मुस्लिम रहिवाशी यांनी मालवण तहसीलदार व मालवण पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी हसरत खान, जाबीर खान, सलीम खान, बखतीयार खान, बशीर अथनीकर, मुस्ताक अथनीकर, नदीम मुजावर, बाबा मुकादम, फारूक मुकादम, सिद्धिक पटेल, सलाम मुजावर, सरदार ताजर, ईमू मुजावर, कैसर पठाण आदी उपस्थित होते.

स्थानिक रहिवाशी मुस्लिम समाज व हिंदू समाज एक दिलाने राहत आहे. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. परंतु काही दिवसांपासून काही परप्रांतीय मुस्लिम व्यक्ती मालवण मध्ये येऊन समाजाला गालबोट लावण्याचे कृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आहेत. अश्या परप्रांतीयां विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. जेणेकरून असे कृत्य करण्याची हिंमत दुसऱ्या व्यक्तीची होणार नाही. असेही मुस्लिम समाज रहिवाशी यांनी सांगितले.

आम्ही मुस्लिम समाज देशप्रेमी

आम्ही मालवणवासी मुस्लिम समाज देशप्रेमी आहोत आणि देशप्रेमीच राहणार. रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा विजय आम्हाला अभिमान आहे.असेही मालवणातील मुस्लिम समाज यांनी सांगितले.