वाहनचालकांमधून समाधान व्यक्त
वैभववाडी प्रतिनिधी
तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही.
करूळ घाटाच्या नूतनीकरणासाठी गेल्यावर्षी २२ जानेवारी पासून घाटातील वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली होती. सुरवातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर घाटातील कामाचा आढावा घेत प्रशासनाकडून वाहतूक सुरु करण्याच्या तारीख पे तारीख देण्यात आल्या. मात्र प्रशासन त्या त्या तारिखला घाट मार्ग सुरु करू शकले नाही. त्यामुळे सर्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी महिन्याभरात दोन वेळा घाट मार्गाची पाहणी केली होती. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कठड्यांची उंची वाढवण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर घाटरस्ता सुरू करा. असे आदेश दिले होते.
त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली. तर स्वतः जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनीही काही दिवसापूर्वी करूळ घाटात भेट देऊन पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. सध्या काही दिवस वैभववाडी करूळ घाटातून कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर कोल्हापूरकडून येणारी वाहतूक ही पूर्वी प्रमाणे भुईबावडा घाटातून सुरु राहणार आहे. १५ मार्च नंतर आढावा घेऊन दोन्ही बाजूने वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेले १४ महिने घाटातून वाहतूक बंद असल्याचा फटका प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी तसेच शेतकरी यांना बसला आहे. ऐकेरी वाहतूक सुरु झाल्यामुळे या सर्वांना थोडासा दिलासा मिळाला आहे.











