तीनशे वर्षांनी मिठबावचा श्री देव रामेश्वर येणार कुणकेश्वर भेटीला
देवगड : प्रतिनिधी
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावास्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग आहे.
त्याचबरोबर प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता देखील याच दिवशी होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे. कुणकेश्वर भेटीला यावर्षी १० देवस्वाऱ्या येणार असून तब्बल ३०० वर्षांनी मिठबावचा श्री देव रामेश्वर तर ३९ वर्षांनी आचरा येथील श्री देव रामेश्वर देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे.
यात्रेचा कालावधी दोन दिवसांचा असल्याने यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असून शिवभक्तांची पावले कुणकेश्वर क्षेत्री वळू लागली आहेत.
कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्ण; प्रशासन सज्ज
कुणकेश्वर यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या तयारीसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. एसटी, वीजवितरण, पोलीस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलून गेला आहे. यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत.
त्याचप्रमाणे कुणकेश्वर समुद्रकिनारी भेल, आईस्क्रिम व इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा दुकानदारांनी फुलून गेला आहे.
चोख वाहतूक व्यवस्थापन; तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था
दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांश वाहतूक पुलावरून होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल.
तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे:
- तारामुंबरी-मिठमुंबरी पुल मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी – आस्मी हॉटेलनजिक
- कणकवलीहून लिंगडाळ मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी – हॉटेल शिवसागरसमोर
- आचरा-मिठबाव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी – एमटीडीसीसमोर वाळूवर पार्किंग व्यवस्था
यात्रेतील अनुचित प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस टेहळणी पथक तसेच देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कुणकेश्वर भेटीसाठी जाणार १० देवस्वाऱ्या
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी १० देवस्वाऱ्या जाणार आहेत.
यामध्ये:
- मिठबाव श्री देव रामेश्वर (३०० वर्षांनी)
- श्री इनामदार रामेश्वर संस्थान, आचरा श्री देव रामेश्वर (३९ वर्षांनी)
- शिरगाव श्री देवी पावणाई देवी (२२ वर्षांनी)
- देवगड जामसंडे ग्रामदैवत श्री दिर्बा रामेश्वर (१२ वर्षांनी)
- श्री देव माधवगिरी, माईन कणकवली
- श्री गांगेश्वर, नारींग्रे
- श्री देव जैनलिंग, रवळनाथ, महालक्ष्मी, पावणादेवी, गांगो, बिडवाडी कणकवली
- श्री देव गांगेश्वर, बावशी, बेळणे, कणकवली
- श्री पावणादेवी, हुंबरठ, कणकवली
- श्री गांगेश्वर पावणाई, भावई, दाभोळे
यावर्षी विक्रमी १० देवस्वाऱ्या कुणकेश्वरमध्ये जात असल्याने तसेच यात्रेचा कालावधी दोन दिवसांचा असल्याने गर्दीचा उच्चांक गाठणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २४ तास कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
- २६ पोलीस अधिकारी
- १०३ पोलीस अंमलदार
- १४९ होमगार्ड
- एकूण २७८ पोलीसांचा बंदोबस्त
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा राबवली जाणार आहे.
२६ एसटी गाड्यांचे नियोजन
देवगड आगारातून २६ एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली.
यामध्ये:
- देवगड – ११ गाड्या
- शिरगाव – ६ गाड्या
- नांदगाव – २ गाड्या
- पोयरे – १ गाडी
- नारींग्रे, दहिबाव – १ गाडी
- किंजवडे, डोबवाडी – १ गाडी
- मोंडतर, टेंबवली – १ गाडी
- आरे, निरोम – १ गाडी
- तळेबाजार, तळवडे, बागतळवडे – १ गाडी
- तेलीवाडी, ताम्हाणेतर – १ गाडी
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार
दरम्यान, कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.












