मोती तलावालगतच्या नाल्यामध्ये पुन्हा दिसणार कृत्रिम वन्य पशू पक्षी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर स्व. बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यानजीक असलेल्या नाल्याच्या काठावर कृत्रिम पशुपक्षी बसविण्यात आले होते. मात्र बरीच वर्षे लोटल्याने त्यातील अनेक प्राणी मोडकळीस आले होते. पर्यटकांचे लक्ष वेधणाऱ्या या पशुपक्ष्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेने नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत त्या ठिकाणी नवीन प्राणी व पक्षी बसविण्याचे काम हाती घेतले आहे त्याबद्दल सामाजिक बांधिलकी संघटनेने बालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मोती तलावालगत असलेल्या नाल्याच्या काळातर वन्यजीव तसेच कृत्रिम प्राणी बसवण्यात आले होते. त्यामध्ये वाघ, हरिण, सांबर, बगळे असे पशु पक्षी त्या परिसरात पर्यटकांचे व नागरिकांचेही आकर्षण ठरले होते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने त्या परिसराला एक आगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

परंतु काही वर्षानंतर सदर कृत्रिम प्राणी जीर्ण होऊन तेथील काही प्राणी मोडून पडले होते. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधून सदर ठिकाणी पुन्हा कृत्रिम प्राणी बसवा असे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच नगरपालिकेने कार्यवाही करून पुन्हा सदरचे कृत्रिम प्राणी बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

अलीकडे सावंतवाडी मोठी तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख ७१ हजार रुपये निधी मंजूर झाला होता त्या निधीतून हे

पशुपक्षी नूतनीकरण करण्याचे काम तसेच लगत असलेल्या रेलिंगचे काम देखील करण्यात यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेने केली होती.

या पाश्वभूमीवर सदर कृत्रिम वन्यजीव प्राणी बनवण्याचे काम माजगाव येथील शिल्पकार काका सावंत यांनी या कलाकृती साकारल्या आहेत. यात वाघ, सांबर, हरिणे, बगळे व अन्य काही पशुपक्ष्यांचा समावेश आहे. अत्यंत आकर्षक व लक्ष वेधून घेणारे असे हे प्राणी व पक्षी काका सावंत या कलाकाराने तयार केले असून लवकरच ते त्या भागात बसविण्यात येणार आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या आवाहनाची दखल घेऊन हा उपक्रम लवकरात लवकर राबवल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने रवी जाधव यांनी काका सावंत व नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.