वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सात दिवसीय निवासी शिबिर संपन्न

अडूर – नागझरी येथे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासास हातभार

गुहागर l प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने अडूर – नागझरी ग्रामपंचायत येथे आयोजित सात दिवसीय निवासी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतले.

 

शिबिराच्या काळात वनराई बंधारे बांधकाम, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, सामायिक वनीकरण आणि शाळा सुशोभीकरण या महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणाच्या दृष्टीने गावकऱ्यांच्या सहकार्याने वनराई बंधारे उभारण्यात आले. ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ग्राम स्वच्छता उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच प्लास्टिकमुक्त गाव मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे पटवून देण्यासाठी विविध प्रात्यक्षिके सादर केली. सामायिक वनीकरण उपक्रमाद्वारे गावाच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तर शाळा सुशोभीकरण उपक्रमाअंतर्गत शाळेच्या आवारात रंगरंगोटी व स्वच्छता करून विद्यार्थ्यांसाठी सुंदर व प्रेरणादायी वातावरण तयार करण्यात आले.

 

सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार, श्री.ऋषिकेश गोखले, नागझरी गावचे सदस्य सुशील नितोरे व सुरेश मांडवकर तसेच संपूर्ण ग्रामस्थ यांचा उत्साही सहभाग लाभला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे गावाचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. या निवासी शिबिराचे कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.अरुण सरगर यांनी काम पाहिले. तसेच त्यांना सहकारी प्रा.कृष्णा मालठाणकर व प्रा.अपर्णा मुरकर यांचे सहकार्य लाभले.