चाळीस टन कचरा संकलीत
परिसराचे रूपडे पालटले
८४५ श्री सदस्यांचा सहभाग
पाचल (वार्ताहर): डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत तालुक्यातील पाचल तसेच खारेपाटण येथ भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून सुमारे पस्तीस ते चाळीस टन कचरा गोळा करण्यात येवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी पाचल व खारेपाटण येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान पाचल विभागात आठवडा बाजार परिसर, बाजारपेठ, शासकीय गोडाऊन परिसर, जवळेथर रोड रस्ता ते सरस्वती विद्यामंदिर त्याच प्रमाणे खारेपाटण विभागात ग्रामपंचायत परिसर, पोलीस चेक पोस्ट ते रामेश्वर नगर हायवे रोड, आठवडा बाजार रस्ता, चव्हाटा परिसर, स्मशानभूमी परिसर, आठवडा बाजार रोड ते एस.टी. डेपो परिसरातील रस्त्यांची आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.या स्वच्छता अभियानामुळे परिसराला नवी ओळख मिळाली आहे. पाचल येथील स्वच्छता अभियानाची सुरुवात सरपंच बाबालाल फरास व उपसरपंच आत्माराम सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पाचलमधील सुमारे २.५०० कि. मी. रस्त्याची स्वच्छता यावेळी श्री सदस्यांनी केली.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. प्रतिष्ठानद्वारे विविध ठिकाणी समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात. यात दासबोध या ग्रंथाचे निरूपण केले जाते. व्यसनमुक्तीसाठी प्रतिष्ठान विशेष प्रयत्न करते. अनेक लोकांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रतिष्ठानद्वारे स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे यांसारखे सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरजू लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.
खारेपाटण येथील अभियानात राजापूर, नाणार, सागवे, अणसुरे बाकाळे, केळवली, दोनिवडे बैठकीतील ५४० श्री सदस्य तर पाचल विभाग मधील स्वच्छता अभियानात भालावली, गावडे आंबेरे, कोदवली, रिंगणे, लांजा बैठकीतील ३०५ श्री सदस्य सहभागी झाले होते.












