डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे चिपळूणमध्ये महास्वच्छता अभियान संपन्न

१२ हजार ५९० किलो कचरा गोळा करून दिला स्वच्छतेचा संदेश ; चिपळूण झाले चकाचक

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक २ मार्च रोजी चिपळूण शहर व परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील १७ ठिकाणी ६३८ श्री सदस्यांनी या अभियानात सहभाग घेतला.स्वयंशिस्तीने श्री सदस्यांनी घमेली,फावडे,हातमोजे,मास्क,टिकाव,आकडे,पोती, कोयती आदी स्वच्छतेचे साहित्य वापरून स्वच्छता मोहीम राबविली, यावेळी ९९८५ स्क्वेअर मीटर परिसरात आणि जवळपास १५ किलोमीटर रस्त्यावर १२ हजार ५९० किलो गोळा करून चिपळूण चकाचक केल्याचे दिसून आले.या कचऱ्यामध्ये ७०१० किलो ओला कचरा तर ५५८० किलो सुका कचरा गोळा करून श्री सदस्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.श्री सदस्यांच्या या कामगिरी बद्दल नागरिक तसेच प्रतिष्ठित मान्यवरांनी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या उपक्रमांबाबत कौतुक केले.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले ‘स्वच्छता दूत’ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

या शहर स्वच्छता अभियानामध्ये चिपळूण शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या शहर स्वच्छता अभियानामध्ये सावर्डे, पाचाड, धामनंद वावे, अलोरे, लवेळ, सती येथील श्री बैठक मधील हजारोंच्या संख्येने सर्व श्री सदस्य सहभागी झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता अभियानामध्ये अनेक नागरिक देखील सहभागी झाले होते.

या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील सर्व प्रमुख रस्ते व शासकीय कार्यालय परिसर,बस स्थानक,पोलीस स्थानक आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.या ठिकाणी श्री सदस्यांनी गोळा केलेला कचरा वाहतूक करण्यासाठी नगरपालिकेने वाहनांची उपलब्धता करून सहकार्य केले.