डीबीजे जी.आय.एस.चे उपायोजन आणि रोजगार या विषयावर व्याख्यान

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालय भूगोल विभागातर्फे जी. आय. एस.चे उपयोजन आणि रोजगार या विषयावर प्रताप पगारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे असे प्रताप पगारे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ . आर. एम. मोरे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहुल पवार, प्रा. डॉ . राजू झोरे, प्रा. कु. प्रतिक्षा मोहिते उपस्थित होते. भूगोल हा आधुनिकतेचा कास धरणारा विषय आहे, असे उपप्राचार्य मोरे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. राहुल पवार यांनी केले. भूगोल विभागाचे विद्यार्थी बदलत्या काळात मागे पडू नये यासाठी विभागातर्फे विविध उपक्रमांचे कसे आयोजन केले जाते याचा आढावा त्यांनी घेतला. भूगोल विभागातर्फे दरवर्षी जी. आय. एस. कोर्स अत्यंत कमी किमतीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जातो, त्यामुळे ग्रामीण भागातील कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जी. आय. एस. क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची दारे उघडली आहेत याचा उल्लेख त्यांनी सांगितले आपल्या व्याख्यानामध्ये श्री. प्रताप पगारे यांनी त्यांचा एक सामन्य कुटुंबातील असूनसुद्धा बी. ए., एम. ए. सोबत जी. आय. एस. तंत्रज्ञानातील ज्ञानाच्या आधारे सध्या आय. टी. क्षेत्रातील मुलांसोबत काम करण्याचा प्रवास, तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा त्यांना झालेला फायदा आणि कामातील प्रगती यातील विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. जी.आय.एस. तंत्रज्ञानाचा उपयोग नेवीगेशन, एखादा नवीन उद्योग, दुकान, पेट्रोल पंप, हॉटेलच्या स्थान निश्चितीसाठी कसा होतो या विषयी सविस्तर माहिती दिली. पर्यटन, आपत्ती निवारण, नगर नियोजन,जलव्यवस्थापन, पूर नियंत्रण, सैन्यदल, कृषी अशा विविध क्षेत्रात जीआयएस तंत्रज्ञानाने रोजगाराच्या नव्या संधी कशा उपलब्ध होत आहेत याची सविस्तर माहिती पी. पी. टी. सादरीकरणाच्या सहाय्याने दिली. जी.आय. एस.चे चांगले अभ्यासक्रम कोण कोणत्या संस्थाकडून उपलब्ध होत आहेत आणि त्यांच्या प्रवेश शुल्काबाबत सविस्तर माहिती दिली . या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुनील भादुले तसेच संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. नलावडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाला कला, माहिती व तंत्रज्ञान, संगणक शास्त्र विभागातील एकूण १३० विद्यार्थ्यांनी उपस्थित होते सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. कामिक्षा खेडेकर तर पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रतिक्षा मोहिते यांनी तर आभार डॉ. आर. बी. झोरे यांनी केले.