रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य तसेच माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. व्ही. एन. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
विद्यमानवर्षी या व्याख्यानमालेचे ३९वे पुष्प दि. १ मार्च रोजी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात डॉ. सुधाकर आगरकर; प्राध्यापक तथा अधिष्ठाता, वी पी एम्स अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन, ठाणे यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले. संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. भौतिकशास्त्राची शाखा म्हणून क्वांटम मेकॅनिक्सच्या स्थापनेचे शतक साजरे करण्यासाठी ‘पुंजगतीकी आणि तंत्रज्ञान’ हा यंदाच्या या विज्ञान व्याख्यानमालेचा विषय होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. वनश्री तांबे यांनी प्रा. व्हि. एन. बावडेकर यांच्या महाविद्यालयीन कार्याची ओळख करून दिली. प्रा. बाबा सुतार यांनी प्रमुख व्याख्याते यांचा परिचय करून दिला. या व्याख्यानमालेत डॉ. सुधाकर आगरकर यांनी पुंजगतीकी हा विषय उलगडताना त्यामागील जगभरातील वैज्ञानिकांच्या शोधांचे दाखले देत त्यामधील भारतीय
शास्त्रज्ञांच्या प्रारंभिक शोधांवर पाश्चात्य वैज्ञानिकांनी नंतर मिळवलेले हक्क यावर प्रकाशझोत टाकला. पुंजगतीकी या आधुनिक विज्ञान आधारित संकल्पनेची व्याप्ती त्याचप्रमाणे त्यात समाविष्ट क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम केमिस्ट्री या विषयांबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात संबोधताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की,
‘संशोधनात्मक कार्य होण्यासाठी आपल्या महाविद्यालयात संशोधन केंद्र निर्माण करून त्यामधून संशोधक विद्यार्थी कसा निर्माण होईल याबद्दल आपण कटिबद्ध आहोत.’ या व्याख्यानमालेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, माजीप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी तसेच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे, माजी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी एस कुलकर्णी, माजी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश बेळेकर तसेच रत्नागिरीतील विज्ञानप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी केले व तांत्रिक मदत प्रा. सनील सावले यांनी केली.












