वैभववाडी l प्रतिनिधी : करूळ घाटमार्गे एसटी वाहतूक सेवा मंगळवार दि. ४ मार्च पासून सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबतचे आदेश विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहेत. करुळ घाटमार्गे एसटी सेवा पूर्ववत होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वैभववाडी – करुळ घाट मार्ग ते गगनवाडा रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू असल्याने करूळ घाट मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर मार्गावरून जाणारी एसटी वाहतूक फोंडा व भुईबावडा या मार्गे वळविण्यात आली होती. मात्र नुकतेच जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी – करूळघाट मार्गे एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या पूर्ववत करण्यात याव्यात, कोल्हापूर कडून येणाऱ्या सर्व फेऱ्या भुईबावडा, फोंडा मार्गे ठेवण्यात याव्यात असे पत्रात परिवहन विभाग नियंत्रक यांनी नमूद केले आहे. सदरची एकेरी वाहतूक ४ मार्चपासून सुरू करण्यात यावी असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.












