भूईबावडा ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ; एकल निराधारांना करमाफीसह मोफत सेवा

एकल निराधारांसाठी दिलासा ; भूईबावड्यात घरपट्टी-पाणीपट्टी माफ

वैभववाडी (प्रतिनिधी) :    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भूईबावडा ग्रामपंचायतीच्या वतीने एकल निराधार महिला व एकल निराधार पुरुष यांच्यासाठी विविध सेवा-सुविधा पुरविण्याचे दायित्व स्वीकारण्यात आले आहे. या अनुषंगाने सरपंच बाजीराव मोरे व ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये एकल निराधार महिलांना साड्या तसेच एकल निराधार पुरुषांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. यापुढे संबंधित लाभार्थ्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय सेवा व औषधे मोफत देण्याचा तसेच जीवनावश्यक धान्य मोफत उपलब्ध करून देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या लाभार्थ्यांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

गावातील निराधार नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन सरपंच बाजीराव मोरे यांनी दिले.

या वेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच बाजीराव मोरे, उपसरपंच स्वप्ताली देसार्ड, ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर, सदस्य कल्याणी देसाई, श्रेया मोरे, मोहिनी कांबळे, वैशाली शिंदे तसेच ग्रामस्थ श्रीधर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.