तांबुळी शाळेतील घटना : त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
बांदा | प्रतिनिधी : तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत आठ दिवसांपूर्वी हजर झालेल्या एका शिक्षकाने दारूच्या नशेत प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीत शिकत असलेल्या जवळपास ३ मुलींना तर ६ मुलगे अशा एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केली. ही संतापजनक घटना मुलांनी जेव्हा आपल्या पालकांना सांगितली त्यावेळी पालक आक्रमक झाले. या घटनेबाबत गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाविरोधात बांदा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक रामचंद्र पाटील (३५, रा. कडलगे बुद्रुक, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
सदर शिक्षकाने अनेक विद्यार्थींना विनाकारण मारहाण केली आहे. यामध्ये मुले जेवणाचे ताट घेऊन जात असताना तसेच वर्ग सुरू असताना प्रश्न विचारले असता त्याची उत्तरे देऊन सुद्धा मारहाण झाली आहे. एका विद्यार्थ्याला इतक्या जोरात मार बसला की त्याने लागलीच उलटी केल्याची त्यांच्या पालकांनी तसेच त्या विद्यार्थ्याने सांगितले. एका विद्यार्थिनीला मार देऊन बहिणी वरील असभ्य अशी शिवी दिल्याचे त्या विद्यार्थिनीने सांगितले आहे. सदर शिक्षक दारूच्या नशेत आपली वरपर्यंत ओळख आहे. माझे कोणी काहीही करू शकत नाही असे पोलिसांना सांगत होता.
यावेळी भाजपा तालुका क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, उप सरपंच जगदीश सावंत, पोलीस पाटील,यशवंत सावंत, ग्रा. पं. सदस्य मिलिंद देसाई, मनीषा तांबोळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कमलाकर सावंत, सदस्य यशवंत सावंत, मुख्याध्यापक भरत बांदेकर, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर, भास्कर सावंत, विलास सावंत, उमेश सावंत, रवी देसाई, रविराज सावंत, गजानन सावंत, अनंत सावंत, भरत सावंत, गंगाराम सावंत, विवेक सावंत, नागेश सावंत, दिनेश सावंत, विलास नाईक, अभि कदम, तेजस सावंत, भक्ती कदम, जानकी सावंत, साक्षी तांबुळकर, दीप्ती कदम, विधी सावंत, जानकी सावंत, गायत्री सावंत व पालकांसहित शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.









