गोहत्या गुन्हा अजामीनपात्र करा ;आमदार निलेश राणे

सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ला संरक्षणासाठी निधी द्या

आमदार निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत कोकणातील अनेक प्रश्नांना फोडली वाचा

संतोष राऊळ (मुंबई विधानभवन)
सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला या दोन किल्ल्यांच्या संरक्षणासाठी तसेच डागडुगीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केली.तर गो हत्या प्रतिबंधक कायदा हा अधिक कठोर करण्याची मागणी करत तो गुन्हा अजामीनपात्र करण्यात यावा अशी मागणी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भागघेत आमदार निलेश राणे यांनी केली.

महाराष्ट्रातील शिवकालीन गडकिल्ले हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि शौर्याचा अभिमान आहे. गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची तसेच निगराणीची जबाबदारी ज्या केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्यावर आहे. ते पुरातत्व खाते महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांकरता दरवर्षी नेमका किती निधी उपलब्ध करून देते याची माहिती सभागृहात देण्यात यावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. केंद्राच्या या पुरातत्त्व खात्याकडे राज्यातील शिवकालीन गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी तसेच डागडूजीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरी देखील याची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे याची जाणीव ठेवून राज्य सरकारने सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला या दोन किल्ल्यांच्या संरक्षणासाठी तसेच डागडुगीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

याबरोबरच त्यांनी महाराष्ट्रात लागू असलेला गो हत्या प्रतिबंधक कायदा हा अधिक कठोर करण्याची मागणी करत तो अजामीनपात्र करण्यात यावा असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबईसह कोकणातही मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे गोहत्या केल्या जात असून गोमांश ची विक्री केली जात आहे . याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत याला तातडीने प्रतिबंध करण्यासाठी गोहत्या अजामीनपात्र करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली