माजी सरपंच व आयुर्वेदिक तज्ञ दत्ताराम फावरे यांचा उपक्रम
चिपळूण (वार्ताहर ) : जि.प.शाळा बामणोली नं.१ येथे कृषी दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद जाणकार आणि नाडी परीक्षण तज्ञ आणि गावचे माजी सरपंच दत्ताराम फावरे बामणोली यांच्यामार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि बामणोलीतील दोन्ही अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी यांना छत्री व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर बामणोली शाळा नं.१ व दोन्ही अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री व खाऊचे वाटप दत्ताराम फावरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री फावरे यांनी सांगितले की, आपण मुलांना दिलेले शैक्षणिक साहित्य हे सामाजिक जाणिवे पोटी केली आहे. आम्ही जेव्हा याच शाळेत शिकलो तेव्हा असे मुलांना साहित्य वाटप केले जात नव्हते. कारण तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती. तेव्हा गरिबी होती पण माणुसकीची कमी नव्हती. शाळा गजबजलेली असायची. सेवेचा भाव हा आम्ही याच शाळेतील शिक्षकांकडून शिकलो आहे. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच सुदेश गमरे, हरिश्चंद्र कापले,माजी सरपंच सिताराम तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद पाचकुडे, चंद्रकांत जोगळे, तुकाराम बाईत, रवींद्र कापले, सौ शौर्या पागडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.सान्वी गमरे, मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता सुर्वे, सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका, मदतनीस व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चिपळूणकर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले.











