कशेडी बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी हालचाली सुरू

खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने शिमगोत्सवापूर्वी वाहतूक सुरू करण्याच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून हालचाली सुरू आहेत. बोगद्यात कायमस्वरुपी वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी भरणा करावी लागणारी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणाच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विजेअभावी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून जनरेटरचा वापर केला जाण्याची शक्यता असून याला राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी १५ दिवसांपूर्वी कशेडी बोगद्याची पाहणी करत मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली करण्याची निर्देश दिले होते. त्यानुसार बोगद्यातील विद्युतीकरणासह पंखे बसवण्याच्या कामांनी वेग घेतला होता. मात्र बोगद्यात -कायमस्वरुपी वीजपुरवठ्यासाठी महामार्ग खात्याकडून महावितरणकडे ११ के. व्ही. वीजपुरवठ्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ही रक्कम अद्याप भरणाच करण्यात आली नसल्याचे समजते. यासाठीच्या कार्यवाहीस विलंब लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बोगद्यात कायमस्वरुपी वीजपरवल्यासाठी जनरेटरचा वापर हा पर्यायही निवडण्यात आला आहे. यामुळे शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.