उबाठा सेनेत केवळ युवकांची टाळकी भडकविण्याचे काम सुरू – स्वप्निल धुरी यांची टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर नितेश राणेच हिंदूंच्या मागे ताकदीने उभे

मंत्री नितेश राणे यांच्यामुळेच हिंदू जगतोय बिनधास्त 

 युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी यांचा नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

वैभववाडी l प्रतिनिधी :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदूंच्या मागे ताकदीने उभा राहणारा नेता म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. मंत्री नितेश राणे यांच्यामुळेच हिंदू बिनधास्तपणे जगत आहे. उबाठा सेनेत युवकांची टाळकी भडकविण्याचे काम केवळ सुरू आहे. नितेश राणे यांना बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची संख्या उबाठात जास्त आहे. अशी टीका उबाठा सेनेतून भाजपात प्रवेश केलेले स्वप्निल धुरी यांनी केली आहे.

उबाठा युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. स्वप्निल धुरी पुढे म्हणाले, शिवसेनेत दहा वर्ष प्रामाणिक काम केले. परंतु ही सर्व वर्ष युवकांची फुकट गेली.

परजिल्ह्यात गेल्यावर स्वतःची ओळख सांगताना शिवसेनेचा असून देखील राणेंचा जिल्हा म्हणावं लागतं हे वास्तव आहे. हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात राणेंच्या नावाने ओळखला जातो. सिंधुदुर्ग म्हणजे राणे, आणि राणे म्हणजे सिंधुदुर्ग असे समीकरणच जुळले आहे.

मंत्री नितेश राणे यांची महाराष्ट्रातील भाषण भाजपा व्हाट्सअप ग्रुप पेक्षा सेनेच्या ग्रुप वर अधिक व्हायरल होत असल्याची कबुली ही धुरी यांनी दिली. हिंदू म्हटल्यावर बाळासाहेब ठाकरेंची अजूनही आठवण येते. परंतु त्यांचे ते विचार उद्धव ठाकरे यांनी सोडून दिले. त्यानंतर हिंदूंच्या मागे ताकदीने उभा राहणारा नेता म्हणजे नितेश राणे. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीमुळेच हिंदू आज समाजात ताठ मानेने जगत आहे. प्रत्येक हिंदूंना आज खात्री पटली आहे, नितेश राणे आमच्या पाठीशी आहेत. नितेश राणे यांचा संपूर्ण मुस्लिम समाजाला विरोध नसून हिंदूंच्या देवतांवर दगडफेक करणाऱ्या, हिंदूंच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या मुस्लिमांनाच त्यांचा विरोध आहे. राणे यांना बदनाम करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी धडपड सुरू आहे. आणि हे आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लक्षात आल्यामुळे भाजपात दाखल झालो आहे. यापुढे भाजपची सर्व कामे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार व प्रचार व प्रसार ताकदीने करणार असे सांगितले. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपात समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.