सावंतवाडी कारागृहातील बंदींना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण
सावंतवाडी । प्रतिनिधी : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणाचा कारागृहातून मुक्त झाल्यानंतर फायदा होणार तसेच त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी बँक ऑफ इंडियाकडून लोन प्राप्त होणार आहे. त्यामुळे कारागृहाचे ब्रीदवाक्य असलेले सुधारणा व पुनर्वसन हे सार्थकी ठरणार असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके यांनी दिली.
अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके व विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुपेकर तसेच कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग श्री. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी जिल्हा कारागृहामध्ये आर सिटी कुडाळ व बँक ऑफ इंडिया कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील १४ बंदींना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. मेश्राम, आर सिटी कार्यालयाचे किशोर राठी व त्यांचे प्रशिक्षक यांचे सहकार्याने मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण यशस्वीरित्या राबवणे शक्य झाले आहे. सदर कार्यक्रम कारागृहामध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी सतीश कांबळे कारागृह अधीक्षक, संदीप एक शिंगे वरिष्ठ तुरुंगाधिकारी व संजय मयेकर तुरुंगाधिकारी यांचे सहकार्य लाभले.










