वेंगुर्ले उभादांडा येथील श्री गणेश मंदिरातील गणपतीचे सागरेश्वर समुद्र किनारी विसर्जन

वेंगुर्ले l दाजी नाईक :दीपावली लक्ष्मीपूजन दिवशी विराजमान झालेल्या वेंगुर्ले उभादांडा येथील श्री गणेश मंदिरातील गणपतीचे होळी पौर्णिमे अगोदर रविवारी रात्री तब्बल साडेचार महिन्यांनी ढोल ताशाच्या गजरात, भजनाच्या साथीने भाविकांच्या उपस्थितीत सागरेश्वर समुद्रात विसर्जन करण्यात आले.

गेली शंभर वर्षांपेक्षा जास्त हे जुने श्री गणेश मंदिर आहे. येथे आगळी वेगळी प्रथा आहे. मंदिरात गणपतीची मूर्ती बसविली जाते केवळ साडेचार महिने. म्हणजेच मंदिरात गणपती मूर्तीचे वास्तव्य एवढ्या कालावधीत असते. अन्य दिवशी येथे गणपतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.

मोठ्या उत्साहात दरवर्षी दीपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी गणपती विराजमान होतो आणि त्यानंतर होळी पौर्णिमेच्या अगोदर त्याचे विसर्जन होते. मंदिरात दररोज भजने, नाटक, वार्षिक जत्रा, असे विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. दरम्यान रात्री भजन आरती करत गणपतीचे विसर्जन भक्ती पूर्ण वातावरणात सागरेश्वर समुद्र किनारी करण्यात आले.