बामणोली येथील श्री वाघेश्वरी माता येणार भेटीला
चिपळूण : तालुक्यातील वाघिवरे येथे धुलीवंदनाच्या दिवशी गेली अनेक वर्षे बामनोली येथील श्री वाघेश्वरी ग्रामदेवता आणि वाघिवरे येथील श्री चंडकाई कालकाई, ग्रामदेवता पालखी भेट सोहळा होत असतो. यावर्षीही शुक्रवार १४ रोजी सायंकाळी ४ वाजता वाघिवरे सहाणे वरती या दोन ग्रामदेवतांचा पालखी भेट सोहळा रंगणार आहे.
गेली अनेक वर्ष शिमगा उत्सवामध्ये या दोन ग्रामदेवता एकमेकींना भेटत असतात. बामनोली येथील श्री वाघेश्वरी माता दुपारी तिचा सहान भरण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर वाजत गाजत वाघिवरे गावाच्या दिशेने प्रस्थान करते. यावेळी या ग्रामदेवतेच्या पालखीसोबत अनेक लहान थोर तिचे भक्त अक्षरशः उन्हातून चालत जात असतात. ढोल ताशाचा गजर आणि गावकऱ्यांची शिगेला पोचलेली पालखी भेटीची उत्सुकता यामुळे या सोहळ्याला खर तर रंग चढतो. दुसरीकडे वाघिवरे सहाणे वरती या पालखी भेट सोहळ्याची जय्यत तयारी वाघिवरे ग्रामस्थांच्या वतीने केलेली असते. सायंकाळी चारच्या दरम्यान बामणोली वाघेश्वरी देवीची पालखी वाघिवरे सहाणे वरती आल्यानंतर सहानेला प्रदक्षिणा घातल्यानंतर वाघिवरे गावची ग्रामदेवता चंडकाई कालकाई, आणि बामणोलीची श्री वाघेश्वरी माता यांची भेट होते. एकमेकीला ओटी दिली जाते. हा नेत्र दीपक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्या नाचवण्याचा कार्यक्रम होतो. तेवढीच ढोल वाजवण्यात मध्ये सुद्धा रंगत आलेली असते. त्यानंतर दोन्ही पालख्या सहाणे वरती विराजमान होतात आणि नंतर भाविक रांगेत दर्शन घेतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघण्याच्या आधी दोघींची गळा भेट होते. आणि बामणोली ग्रामदेवता परतीच्या प्रवासाला प्रस्थान करते.
या उत्सवातील पालखी भेट पहावयास मुंबई पुणे येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाकरमानी हजर असतात. दोन्ही गावचे मानकरी, गावकरी मिळून या पालखी भेट सोहळ्याचे नियोजन करतात.












