राजापूरात उद्या ‘पालखी महोत्सव’ चे आयोजन

सकाळी ८.३० वाजता उद्घाटन सोहळा

१० मानाच्या पालख्या होणार सहभागी

राजापूर (वार्ताहर): राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने रविवार १६ मार्च रोजी शहरातील यशोदिन सृष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पालखी महोत्सवात’ दहा मानाच्या पालख्या आणि पारंपारिक गोमूचा नाचाचे तीन संघ सहभागी होवून पारंपारिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत.

सकाळी ८.३० वाजता प. पु. गगनगिरी महाराज यांचे नातू (वंशज) प. पू. संजयसिंह पाटणकर (सरकार), प. पु. गगनगिरी महाराज आश्रम सेवा संस्थान, ओणी-कोंडीवळेचे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज, सद्गुरु ह. भ. प. विश्वनाथ (भाई) गोसावी यांच्या प्रमुख उपस्थीतीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळयाचे अध्यक्षस्थान राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे भुषविणार आहेत.

या महोत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या देवदेवतांसह, आपल्या पारपारिक खेळे, ढोल ताशांसह सहभागी होवून शिमगोत्सवातील पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. गावागावात साजरा होणारा हा उत्सव आता राजापूर शहरात एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहे. कला, क्रीडा, सांस्कृतीक परंपरांचे जतन आणि सर्वधनाच्या हेतुन स्थापन झालेल्या राजापूर प्रतिष्ठानने हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे.

या महोत्सवात श्री महालक्ष्मी उन्हाळे, श्री गांगोदेव कोंढेतड, श्री पंचग्रामदेवता गोठणे दोनिवडे, श्री दुर्गादेवी पाथर्डे, श्री नवलादेवी शेढे, श्री गांगोदेव शीळ, माता पुर्वादेवी हातणकरवाडी, श्री नवलादेवी शीळ, निशाण खेळे बाईंगवाडी, नवजीवन विकास मंडळ तेरवण आदी दहा मानाच्या पालख्या त्याचबरोबर बाकाळे, धोपटेवाडी व दिवटेवाडी राजापूर यांचा पारंपारिक गोमूचा नाच यांचा सहभाग राहणार आहे.

शिमगा हा कोकणचा सणच नाही तर तो उत्सव आहे. या सणाला कित्येक पिढयांची परंपरा लाभली आहे. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढीला आपल्या रूढी परंपरा सण यांचा विसर पडू लागला आहे. अशावेळी निखळ आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या परंपरागत संस्कृतीची ओळख व त्याची जाण नव्या पिढीला व्हावी तसेच काळाच्या प्रवाहात लुप्त होवू पाहणाऱ्या कोकणातील संस्कृती आणि कलेचे जतन व्हावे या उद्देशाने या पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवसभर हा सोहळा रंगणार आहे. सहभागी झालेल्या गावांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या निर्धारीत वेळेत पालखीनृत्य, टीपरीनृत्य, ढोल नृत्य यांचे सादरीकरण करणार आहेत. यातील सहभागी ग्रामदैवतांचा यथायोग्य मान सन्मान राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने केला जाणार आहे. तर जाणकार परिक्षकांमार्फत परिक्षण देखील केले जाणार आहे. कोकणी मातील असली लोककलांचा अविष्कार यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन एकाच व्यासपीठावर या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, नव्या पिढीमध्ये याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असा प्रामाणिक हेतू असून तरूण पिढीसह अबाल वृध्दांनी या सोहळयाला उपस्थीत राहून आनंद घ्यावा असे आवाहन राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.