“ आधार आनंद ट्रस्ट, चिपळूण”चा दिव्यांग विद्यार्थ्याला शैक्षणिक मदतीचा उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी)--: आधार आनंद ट्रस्ट, चिपळूण यांच्या वतीने जिद्द मतिमंद शाळा, वडार कॉलनी, गांधीनगर, बहादूरशेखनाका येथील दिव्यांग आणि गुणवंत विद्यार्थी मंगेश अनंत डोंगरे (मांडकी, कासारवाडी) याच्या संपूर्ण वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला.

यावेळी शाळेत आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक कुचेकर यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी शाळेच्या कार्याचा तसेच ट्रस्टच्या समाजोपयोगी उपक्रमांचा परिचय करून दिला. ट्रस्टचे अध्यक्ष समीर कदम आणि सेक्रेटरी मंगेश पेढांबकर यांनी आतापर्यंत ट्रस्टने राबवलेले विविध उपक्रम — सुशिक्षित बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिर, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम, गावातील शाळेमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या व छत्री वाटप यांची माहिती दिली आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही अधिक जोमाने राबवले जातील, असा निर्धार व्यक्त केला.

मदतीचा धनादेश अध्यक्ष समीर कदम आणि सेक्रेटरी मंगेश पेढांबकर, उपाध्यक्ष संतोष तडसरे, सहसेक्रेटरी विजय चितळे, खजिनदार लक्ष्मण शिंदे, सदस्य राजेश केळसकर व महंमद रियाने यांच्या हस्ते विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास प्राचार्य श्री. शिंदे, कुचेकर व अन्य शिक्षकवर्ग उपस्थित होता. ट्रस्टतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत निःस्वार्थ मेहनत करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार व कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार मानत करण्यात आली.