रोख रक्कम आणि सोन्याची वस्तु असलेली पर्स महिलेला केली परत
संतोष कोत्रे l लांजा-: एसटी बसमध्ये प्रवासा दरम्यान सापडलेली व रोख रक्कम आणि सोन्याची वस्तु असलेली पर्स संबंधित महिलेला परत करून लांजा एसटी आगारातील चालक आणि वाहकाने आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोट ते लांजा असा प्रवास करताना रेश्मा गावडे या महिलेची पर्स बसमध्येच राहिली होती. यावेळी त्या बसमध्ये चालक महेश शेणवी आणि वाहक संतोष चव्हाण ड्युटीवर होते. त्यांना एक पर्स बसमध्ये राहिलेली आढळून आली. ती पर्स त्यांनी तपासून पाहिल्यानंतर त्या पर्समध्ये ३७०० एवढी रोख रक्कम व दोन सोन्याच्या रिंगा असा ऐवज होता. त्यानंतर या दोन्ही कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे सदर पर्स लांजा बस स्थानकाच्या कंट्रोल रूममध्ये आणून दिली.त्यानंतर संबंधित महिला रेश्मा गावडे चौकशी करिता आल्यानंतर त्यांना ती पर्स ओळख पटवून परत देण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक वाहतूक अधिक्षक लांजा सौ.भाग्यश्री प्रभुणे, कामगार संघटना सचिव साईप्रसाद जुवेकर आदी उपस्थित होते.
अशाप्रकारे बसमध्ये सापडलेली रोख रक्कम व सोन्याची मौलव्यान वस्तु परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारे
लांजा आगारातील महेश शेणवी आणि संतोष चव्हाण यांचेवर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











