शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य वाहन फेरी संपन्न
आज शिवजयंती उत्सवाचे आयोजन
राजापूर (वार्ताहर): जय भवानी..जय शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज कि जय..!! छत्रपती संभाजी महाराज की जय…!! नम: पार्वती पदे…हर हर महादेव!!! च्या गगनभेदी घोषणांनी रविवारी ऐतिहासिक वारसा लाभलेले राजापूर शहर दुमदुमून गेले. निमित्त होते सोमवारी तिथीनुसार साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य वाहन फेरीचे. राजापूर शहरातून काढण्यात आलेल्या वाहनफेरीने राजापूर शहर गजबजून गेले.
शिवस्मृती मंडळ राजापूरच्या वतीने राजापुर एसटी डेपो ते राजापूर शहर अशी वाहन फेरी काढण्यात आली. एसटी डेपो या ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन वाहनफेरी प्रमुख सामर्थ्य नार्वेकर यांच्या हस्ते तर माजी नगरसेवक विनय गुरव यांच्या हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगरसेवक अभय मेळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वाहन फेरीचा प्रारंभ करण्यात आला.
एसटीडेपो ते जकात नाका मार्गे मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक छत्रपती संभाजीपेठ, बाजारपेठ, चिंचबांध वरचीपेठ, छत्रपती शिवाजी महाराज पथ, गुजराळी ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशी ही भव्य वाहन फेरी काढण्यात आली.
वाहन फेरीत सहभागी शिवप्रेमी महिला व पुरुषानी भगवे फेटे परिधान केले होते. त्यामुळे शहरात भगवे वातावरण निर्माण झाले. वाहन फेरी शिव स्मारकात आली असता असता वाहनफेरीचे प्रमुख सामर्थ्य नार्वेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या नावाचा एकच जयघोष करण्यात आला. तर शिवभक्त राजू मोरे यांनी ध्येय संत्र सांगितला. सामुदायिक पणे हा ध्येयमंत्र म्हणण्यात आला. सुमारे १५० शिवप्रेमी तरूण, तरूणी, लहान बालके, नागरिक या वाहन फेरीत सहभागी झाले होते. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात ही वाहन फेरी काढण्यात आली.
सोमवारी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता शिवस्मारकात छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मुर्तीची पाद्यपूजा, अभिषेक, पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवकालीन चित्ररथ देखाव्यांसह छत्रपती शिवाजी शिवरायांचा पालखी सोहळा होणार आहे. यामध्ये पालखी, ढोलपथके, लेझीम पथक, झांज पथक यांसह शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
रात्रौ ९.०० वाजता राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे स्थानिक कलाकारांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा सादर करणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्मृर्ती मंडळ राजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.