पोस्ट ऑफिसमार्फत काढलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमुळे कोकरे कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार

कणकवली : पोस्ट ऑफिस मार्फत काढलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमुळे असरोंडी येथील एका गरीब कुटुंबाला जगण्यासाठी आर्थिक आधार मिळाला. विमाधारक जनार्दन धाकू कोकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला विम्याच्या दाव्याचे २ लाख रुपये कणकवली पोस्ट ऑफिसमार्फत आदा करण्यात आले. असरोंडी गावचे रहिवासी असलेले जनार्दन कोकरे यांनी पोस्ट ऑफिसमध्ये प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतली होती. याअंतर्गत वार्षिक ३३० रुपयांमध्ये त्यांना २ लाख रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त झाले. कोकरे यांचे २३ नोव्हेंबर २०२४ ला वयाच्या ४३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी वंदना कोकरे यांच्यावर तीन मुलींचे शिक्षण व पालन पोषणाची जबाबदारी आली. तेव्हा पोस्ट ऑफिसमार्फत त्यांच्या पतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतल्याचे त्यांना समजले.

 

कणकवली पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर गिरीश कामत व सहायक पोस्ट मास्तर अशोक गावडे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून २५ जानेवारीला दाव्यासाठी प्रस्ताव संसद मार्ग, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला. हा दावा १८ फेब्रुवारीला मंजूर झाला व मृत जनार्दन कोकरे यांची वारस पत्नी वंदना यांच्या पोस्ट खात्यात २ लाख रुपये २८ फेब्रुवारीला जमा केले. कोकरे कुटुंबाला अशा परिस्थितीत मिळालेली ही रक्कम आर्थिक पाठबळ देईल, अशा भावना व्यक्त करत कणकवली पोस्ट ऑफिसने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.