कारमधील दोघे ताब्यात : गुन्हा दाखल
आंबोली । प्रतिनिधी : भरधाव वेगाने जाणाऱ्या पंढरपूर येथील पर्यटकांच्य्या कारने आंबोली बाजारपेठेत येथे दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत गाडी थेट तेथील एका दुकानात घुसली. ही घटना आज दुपारी आंबोली बाजारपेठेत घडली. या अपघातात दुचाकीवरील आई व मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. साखरी जानू कोकरे (वय ७२) आणि बमु जानू कोकरे (वय ३३, दोघेही राहणार चौकुळ चुरनीची मूस) अशी जखमींची नाव आहेत. त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातप्रकरणी सचिन दत्तात्रय कांबळे (वय ३५) व आकाश विठ्ठल राऊत (वय ३३, दोघे रा. गांधी चौक पंढरपूर) यांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर कारमधील दोघांनी अपघातानंतर पोबारा केला. अपघाताच्या घटनेनंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
अपघातानंतर सुनील नार्वेकर, दिलीप सावंत, पंढरी कर्पे, उपसरपंच दत्तू नार्वेकर, सचिन नार्वेकर, महेश नार्वेकर आदींनी जखमींना त्वरित उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींवर प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, आदिती पाटकर यांनी उपचार केले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे १०८ रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले. तेथे उपचारानंतर जखमी साखरी कोकरे यांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने त्यांना गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी आरोग्य केंद्रात भेट दिली. हवालदार दीपक शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे. ते कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे











