SAWANTWADI | मोती तलावात पडलेल्या महाविद्यालयीन युवतीला जीवदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळ्याच्या काठावर बसलेली असताना चक्कर येऊन मोती तलावात पडलेल्या महाविद्यालयीन युवतीला दीपेश शिंदे या युवकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत तलावात उडी घेत जीवदान दिले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील एका अभियांत्रिकी विद्यालयात ती शिक्षण घेत आहे. ती तलावात पडल्याचे निदर्शनास येताच दीपेश शिंदे आणि एकनाथ गावडे यांनी तलावात उडी घेत दोरखंडाच्या साह्याने तिला वर काढले. तिला उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मोती तलावाच्या काठावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र विद्यार्थिनीचे प्राण वाचल्याने सर्वांनाच हायसे वाटले. दीपेश शिंदे, एकनाथ गावडे याच्या या कार्यतत्परतेबाबत त्याचे कौतुक होत आहे.