उभादांडा गावातील बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करा : ग्रामस्थांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
उभादांडा गावात काही बेजबाबदार गुरांचे मालक आपली गुरे दिवसा तसेच रात्रीची मोकाट सोडून देत असल्याने गावातील गोरगरीब भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे ही गुरे नुकसान करत आहेत. याबाबत वारंवार संबधित गुरांच्या मालकांना कल्पना देऊन सुद्धा त्यात काही सुधारणा होताना दिसत नाही. याउलट गुरांचे मालक शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत. यामुळे या गुरांच्या मालकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच सरपंच निलेश चमणकर यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात ग्रामस्थांनी असे म्हटले आहे की, उभादांडा गावात बरेच शेती व भाजीपाला करणारे शेतकरी असून रात्रदिवस मेहनत घेऊन शेती करत आहेत. गावात काही बेजबाबदार गुरांचे मालक आपली गुरे दिवसा तसेच रात्रीची देखील सोडून देत आहेत. आणि ही सर्व गुरे या गोरगरीब भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस अतोनात नुकसान करत आहेत. वारंवार संबधित गुरांच्या मालकांना याची कल्पना देऊन देखील त्यात काही सुधारणा होताना दिसत नाही. उलट दमदाटी ह्या शेतकऱ्यांना करून आमची गुरे नाहीत असे सांगितले जाते.

या गुरांचा त्रास शेतकरी वर्गा बरोबर रात्री अपरात्री शिरोडा, वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांनाही होत आहे. काही दिवसापूर्वी उभादांडा गावातील मोटर सायकल स्वार यात गंभीर जखमी होऊन त्याला गोवा मेडिकल कॉलेज व त्यानंतर मुंबई मध्ये नेण्यात आले. त्यांचा उजवा हात पूर्ण निकामी झाला. आशा रोज घटना घडत आहेत. आणि बेजबाबदार गुरांचे मालक पहाटे गाय, म्हैस फक्त दुध काडण्यासाठी त्यांचा वापर करतात पण त्यांच पालन पोषण करताना दितस नाहीत. यावेळी पंचायत समिती माजी सभापती जयप्रकाश चमणकर, कार्मिस आल्मेडा, मोतेस आल्मेडा, क्लेबिन आल्मेडा, जॉन आल्मेडा, घाब्रू आल्मेडा, आंतोन आल्मेडा, मारुती मांजरेकर, नागेश जुवलेकर, कृष्णकुमार आरोलकर, कृष्णकांत नाईक, सुनील कांबळी, दियोग डिसोजा, उमेश आरोलकर, कुस्तान डिसोजा, आनमारी आल्मेडा, पास्कु आल्मेडा आदी उपस्थित होते.