ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा; फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
निलेश जाधव / देवरूख
दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होवून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई- गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तुरळ येथील सुरज फडकले (वय-२८) आणि धामापूर येथील संदेश भोजने (वय-४०) या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा पसरली असून फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत संगमेश्वर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज फडकले हा आपल्या ताब्यातील युनिकाँन ही दुचाकी घेवून तुरळ ते आरवली असा प्रवास करत होता. तर संदेश भोजने हा अँक्टीव्हा घेवून आरवलीहून तुरळच्या दिशेने येत होता. दोन्ही गाड्या तुरळ गणपती मंदिराजवळ आल्या असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, सुरज आणि संदेश या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे परि. उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे, उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, उपनिरीक्षक विवेक साळवी, पो. हे. काँ. सचिन कामेरकर, हे. काँ. विश्वास बरगाळे, पो. काँ. सोमनाथ खाडे आदिंनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला.
अपघाताची बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तर सुरज आणि संदेशला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषीत केले. ऐन शिमगोत्सवात दोन तरूणांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने तुरळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर तुरळ आणि धामापूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर परिसरात काम सुरू असल्याने वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन संगमेश्वर पोलीसांकडून करण्यात आले आहे. तर महामार्ग ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












