महामार्गावर वर्षभरात १३७ जण दगावले

जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ चा जिल्ह्यातील अहवाल
खेड(प्रतिनिधी) जिल्ह्यात ‘जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर १२७अपघातांमध्ये १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ११५ पुरुषांसह २२ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर झाले आहेत. त्यामध्ये १३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय  महामार्ग रस्त्याचे रखडलेले कामही कारणीभूत ठरत असल्याचे समोर  येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणावळणाचे आहेत. अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. गेल्या वर्षभरात याच कालावधीत ११९ छोटे अपघात झाले. त्यामध्ये.२९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये २१० पुरुषांसह ८२ महिलांचा समावेश आहे. छोट्या ८९ अपघातांमध्ये २६४ जणांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये १८७पुरुष तर ७७ महिलांचा समावेश आहे. तर ६४ अपघातांमध्ये केवळ
वाहनांचे नुकसान झाले असून चालक जखमी झालेले नाहीत.
चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज
महामार्ग चौपदरीकरणानंतर अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरु होण्याची आवश्यकता आहे. २०२५ डिसेंबर अखेर महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु यामध्ये सरकारला किती यश येते, हे येत्या दहा महिन्यात स्पष्ट होणार आहे.