कोकणाला आता सुगीचे दिवस : गंगाराम गवाणकर

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ज्ञानपीठ पुरस्कार द्यावा

वस्त्रहरण नाटकाच्या लंडन टूरच्या किस्स्यांनी गाजवली मैफिल

सावंतवाडी । प्रतिनिधी :
साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. नितेश राणे यांनी साहित्यिकांच्या स्टाईलमध्ये अतिशय छान असे भाषण केले. कोकणातील साहित्य व साहित्यिक यांच्या विषयी असलेली तळमळ त्यांच्या भाषणातून दिसून आली. येथील ग्रंथसंपदेचे व ग्रंथालयांचे जतन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखव. कोकणाला आता खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्गात नितेश राणे, रत्नागिरीत उदय सामंत व मुंबई उपनगरात ॲड. आशिष शेलार यांच्या रूपाने कोकणचे सुपुत्र पालकमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणचा विकास झपाट्याने होईल, असे मत कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले. कोमसाप साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, मधु भाईंनी १९९० मध्ये कोमसापची स्थापना केली. त्यानंतर भाईंनी मालगुंडमध्ये कवी केशवसुतांचं स्मारक उभारलं. त्याच केशवसुतांच्या तुतारीचं शहर असलेल्या सावंतवाडी नगरीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मला दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. मधुभाईंमुळे एका कवीच्या तुतारीचा नाद संपूर्ण देशभरात गेला. केंद्र सरकारलाही या तुतारीची दखल घेत एका रेल्वेला तुतारीचं नाव द्यावं लागलं. एका कवीचा आवाज एका साहित्यिकाने भारतभर पसरविला त्यामुळे भाईंना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करायला हवं, अशी मागणी यावेळी गवाणकर यांनी केली.

कोमसापच्या माध्यमातून अनेक साहित्यिक कार्यक्रम कोकणात होत असतात. हे नव साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे आहेत. आजच्या कार्यक्रमाला मधुमंगेश कर्णिक येणार होते परंतु ते प्रकृतीच्या कारणाने आले नाहीत. त्यांचे साहित्यातील योगदान पाहता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहिजे या संदर्भात राज्यस्तरावरवर असलेल्या कोकणातील नेत्यांनी दखल घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाचा लंडन प्रवास उपस्थित प्रेक्षकांना उलगडून सांगितला. सातशे प्रयोग झाले असताना प्रतिसाद मिळत नसल्याने वस्त्रहरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुण्यात नाट्यप्रयोग केला त्यावेळी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिकांनी हजेरी लावली होती. पु लं नी या प्रयोगाचे कौतुक केले. त्यामुळे या नाटकाला पुन्हा चांगले दिवस आले. मुंबईतही नाट्य कलावंत अभिनेते साहित्यिक यांनी वस्त्रहरण नाटकाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे हा नाट्यप्रयोग लंडनमध्ये करण्याचा निर्णय घेतला. लंडनला जाताना अनेक अडचणी आल्या. तेथील विमानतळावरून इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तीन कलावंतांना पुन्हा देशात पाठवले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ब्रिटनच्या ॲम्बशी जाळून टाकू असा इशारा दिला. त्यामुळे या कलावंतांना पुन्हा लंडनमध्ये प्रवेश मिळाला.

नाटकाच्या लंडनच्या प्रवासाला मधु मंगेश कर्णिक यांनी खूप मोठे सहकार्य केले असे स्पष्ट करत लंडनमध्ये कलावंतासोबत झालेले किस्से सांगून उपस्थित प्रेक्षकांना खळाळून हसवले. यावेळी त्यांनी अनेक कविता सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन देखील केले.

फोटो – कोमसाप जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करताना पालकमंत्री ना. नितेश राणे सोबत कोमसापाच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व अन्य