घरे व गोठयांसह ५९ मालमत्तांचे नुकसान
२१ जणांच्या घरात शिरले पुराचे पाणी
प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू
रस्ते, पुल पुर्ववत करून वाहतुक सुरू करण्यासाठी यंत्रणा सरसावली
राजापूर (प्रतिनिधी): शुक्रवार सायंकाळ पासून संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर शनिवार व रविवारी कायम राहीला असून शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसात तालुक्यात अशंता पडझड होऊन ३ घरे व १ गोठयांचे नुकसान झाले असून २१ जणांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे. तर दहा सरंक्षण भिंती कोसळल्या असून रस्ते, पुल वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वेगवेगळया प्रकारच्या ५९ मालमत्तांचे नुकसान झाल्याचे महसुल प्रशासनाकडून सांगण्यात आले असुन या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्या दुधडी भरून वाहत असून पावसाचा जोर लक्षात घेता नदी किनाऱ्यावरिल व्यपारी व नागरीक सतर्क झाले आहेत. राजापुरात शनिवारी ८१.७५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
तर ज्या गावांत व वाडयांमध्ये रस्ते, पुल, साकव यांची पडझड होऊन वाहतुकीवर परिणाम झाला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी करून तातडीने कार्यवाही हाती घेतली आहे.
शुक्रवारी सायंकाळ पासून राजापूर शहर व तालुका परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा पश्चिम भागातील गावांना बसला आहे. भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर, भू या भागात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने एकच दाणादाण उडविली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, पुल, साकव, रस्ते वाहुन गेले आहेत. तर काजू, सुपारी बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. तर संबधित यंत्रणांनी रस्ते, पुल दुरूस्तीबाबतही कार्यवाही हाती घेतली आहे.
तालुक्यात शुक्रवार अखेर झालेल्या नुकसानीमध्ये अशंता गोठे १, अशंता घरे २, खासगी मालमत्ता १, दरड पडून रस्ता बंद १, दरड पडून घरांचे नुकसान ५, पावसामुळे पुल वाहून गेला १, बागेचे नुकसान १, रस्ता खचला ३, वाहून गेलेले रस्ते ३, पुराचे पाणी घरात शिरून नुकसान २१, विजपडून अंशता घराचे नुकसान २, शाळांचे नुकसान १, शेतीचे नुकसान २, सरंक्षण भिंती १०, सार्वजनिक मालमत्ता २, घराजवळील माती खचली २ अशा एकूण ५९ मालमत्तांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसुल प्रशासनाकडून देण्यात आल आला आहे.
शनिवारी कोंडसर ग्रामपंचायत हद्दीतील दिनेश पांचाळ यांचे घरात पुराचे पाणी जाऊन त्यांचे खुप नुकसान झाले असून त्यांची सुतार कामाची मशनरी पूर्ण निकामी झाली तसेच अन्य फर्निचर वाहुन गेले असून त्यांचे चारचाकी वाहन, दुचाकी, घरगंटी घरातील साहित्य वाहुन गेले आहे. तर वीहसोळ लिगम वाडी, गुरव वाडी येथे पावसामुळे झालेले नुकसान झाले आहे. अणसुरे गावातील भराडे वाडी येथील बंधाऱ्याची पावसामध्ये झडपे तुटून शेतीचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात देवाचेगोठणे,धाऊलवल्ली,भालावली,दसुर,भू,मधलीवाडी, वाडापेठ ठिकाणी रस्ते साकव यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची जि. प. बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून उपअभियंता सतोष भालेकर यांनी पाहणी करून सस्ते वाहतूक सुरळीत करणेबाबत युध्दपातळीवर कामे सुरू केली आहेत.
आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देणार- विकास गंबरे
तालुक्यात काही भागात मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवार पर्यंत या नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील. सदरचे अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून तातडीने आपदग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच खचलेले रस्ते, कोसळलेल्या दरडी हटवीण्याचे कामही सुरू आहे. सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विगाचे अधिकारी तसेच स्थानिक पातळीवर सरपंच पोलिस पाटील यांच्या सहकार्यातुन नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामे वेगात सुरू आहे. रस्ता व वाहतुक बंद रहाणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याचे तहसीलदार गंबरे यांनी सांगितले.
रस्ते, संरक्षण भिंती पुलांच्या कामाचा दर्जा उघड
पहिल्याच मान्सून मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागात एकच दाणादाण उडाली आहे. मात्र या पावसात मोठया प्रमाणावर रस्ते वाहुन गेले असून पुलांचेही नुकसान झाले आहे. तर अनेक भागात रस्त्याला गटार न काढल्याने रस्त्यांची ही अवस्था झाल्याचे पुढे आले आहे. या एकूणच परिस्थितीवरून या रस्ते, पुल, सरंक्षण भिंती यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ठेकेदाराबरोराच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरही शंका उपस्थित केली जात आहे.












