गाणगापूरला सिंधुदुर्गातून प्रथमच एस.टी. बस धावली
सिंधुदुर्ग (विशेष प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये आता सिंधुदुर्गातून थेट गाणगापूरला जाणारी एस.टी. बस एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड, वेंगुर्ले, मालवण डेपोतून पंढरपूर, अक्कलकोट या तीर्थस्थळांवर एस.टी. बस गेली काही वर्षे आहेत. आता सिंधुदुर्ग एस.टी. विभागाकडून सावंतवाडी-गाणगापूर ही सिंधुदुर्गातून गाणगापूरला जाणारी पहिली एस.टी. बस सुरू करण्यात आली आहे. दुपारी २.४५ वाजता सावंतवाडी आगारातून ही गाणगापूरला जाणारी एस.टी. बस सुटेल.ही एस.टी. कुडाळ, कणकवली, गगनबावडामार्गे, कोल्हापूर-सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर या मार्गे ही एस.टी. धावेल. गाणगापूर येथून त्याचवेळेला म्हणजे पहाटे २.४५ वाजता सुटून त्याच मार्गाने पुन्हा सिंधुदुर्गात येईल. आजवर अन्य सर्व तीर्थस्थळावर एस.टी. बसेस धावत होत्या. परंतु गाणगापूर या दत्तस्थळावर ही एस.टी.बस जाणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी जनतेची सोय झाली आहे.












